शिक्रापूर : बाभूळसर (ता. शिरूर) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेसह महिलेच्या मुलाला फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी आलेल्या इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत माधुरी किरण सावंत (वय ३१, रा. बाभूळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. कोंढापुरी, शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे कर्मचारी शिवम बशाप्पा भंडारी व कृष्णाहरी अंबाजी भैरी (दोघे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माधुरी सावंत यांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून कर्ज घेतलेले असताना त्याचा हप्ता थकला असल्याने बँकेचे कर्मचारी शिवम भंडारी व कृष्णाहरी भैरी हे दोघे सावंत यांच्याकडे गेले. सावंत यांनी आज पैसे नाही, मी दोन दिवसाने भरते किंवा माझ्या आईला पैसे देण्यास सांगते, असे म्हटले असता शिवम याने शिवीगाळ, दमदाटी करत मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या, यावेळी माधुरी यांचा मुलगा शिव्या देऊ नका म्हटल्याने दोघांनी महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेजारी असेलला दत्तात्रय सकट हे सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम करत आहेत.