पुणे : लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत थेट महसूल सचिव आणि निवडणूक आयोगाकडे बिनबुडाचे आरोप खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केले होते. या प्रकरणी बडतर्फ असलेल्या कट्यारेंचे शुक्रवारी अखेर निलंबन करण्यात आले आहे. जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात हेतुपुरस्सर संशय निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाने ही कारवाई केली आहे.
महसूल विभागाचे अपर सचिव संजीव राणे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. कट्यारे यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. पुढील दहा दिवसांत त्यांना चौकशी समितीसमोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी संगनमत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे राजकीय प्रभावाखाली येऊन काम करत असल्याचा आरोप कट्यारे यांनी लोकसभा मतमोजणीच्या दोन दिवस आधी केला होता.
याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे प्रधान सचिव, महसूल सचिव यांना थेट पत्र पाठविले होते. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांचा पदभार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढला होता. आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी कट्यारे यांच्या शिस्तभंगाबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला होता.
दरम्यान, राज्य शासनाकडून कट्यारे यांना महसूल विभागाकडून २० जून रोजी नोटीस पाठवून आठ दिवसांत लेखी उत्तर द्यावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, कट्यारे यानी नोटीस नाकारली. अखेर जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या निवासस्थानाबाहेर नोटीस लावण्यात आली. त्यानंतरही कट्यारे यांनी मुदतीत कुठलेच उत्तर दिले नसल्यामुळे त्यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.