अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर न्यायालयाच्या आवारात शिविगाळ, हाणामारी अशा घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शिरूर न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या प्रकाराची दखल घेत न्यायालयाने शिरूर पोलिस स्टेशनला सुरक्षेसाठी नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे.
गेल्या काही महीन्यांपुर्वी शिरूर न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाने दारू पिवून शिविगाळ, मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी अशा घटना घडल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दारू पिवून शिविगाळ करणाऱ्याला समज देऊन सोडण्यात आले होते. तर मैत्रिणीने मारणाऱ्या मित्रावर तक्रार देण्यास नकार दिला होता.
मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या घटना चुकीच्या असल्याने या सर्व प्रकाराची दखल घेत व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिरुर न्यायालयात बंदुकधारी पोलिस नियमितपणे हजर राहणार आहे.