बारामती : राज्याच्या सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच अजित पवार बारामतीमधून लढणार की नाही? याबाबत चर्चा रंगल्या असताना याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून अजित पवार यांनी स्वतः बारामतीमधून लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बारामती विधानसभा लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. महायुतीत कोणाला कोणता मतदारसंघ मिळेल हे ठरलेले नाही. बारामती राष्ट्रवादीच्या वाट्याला आला तर लढण्याबाबत विचार होईल, असं ते म्हणाले.
महायुतीत कोणाला कोणता मतदारसंघ मिळेल हे ठरल नाही. बारामती राष्ट्रवादीच्या वाटेला आल तर त्यांनी सांगितलेली अमंलबजावणी नक्की होईल. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर कार्यक्रेत भावना व्यक्त करत असतात. राजकारणात बहुमताचा आदर करावा लागतो, असंही ते पुढे म्हणाले. तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.