पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम मतदार यादी सोमवार ऐवजी मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. २२ जानेवारीला सार्वजनिक सुटी लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगाने ही यादी मंगळवारी (दि. २३) जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणारी ही यादी यंदा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात दरवर्षी ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. त्यापूर्वी प्रारुप मतदार यादी जाहीर करून त्यावर सुचना व हरकती मागविल्या जातात. यंदा २७ ऑक्टोबरला प्रारुप मतदार यादी जाहीर केल्यानंतर ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, दुबार नावे वगळणे तसेच मृतांची नावे वगळणे या कामासाठी १५ दिवसांचा अतिरिक्त अवधी मिळावा, नवमतदारांना नाव नोंदणीची पुन्हा संधी मिळावी यासाठी २२ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे ठरले होते. नावे वगळल्याने मतदारयादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होईल असे या वेळी सांगण्यात आले होते.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, “राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सरकारने जाहीर केलेली सार्वजनिक सुटी लक्षात घेता अंतिम मतदार यादी २२ जानेवारीच्या ऐवजी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल.” असे म्हणाले. त्याशिवाय, “केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला, तरुण तसेच उपेक्षित गट, ज्यामध्ये अपंग व्यक्ती आणि ट्रान्सजेंडर मतदार आणि नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.” असे सांगितले. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी शिष्टमंडळासमोर तयारीबाबत तपशीलवार सादरीकरण केले.