पुणे : महाराष्ट्र शासनाने ‘फुरसुंगी व उरुळी देवाची’ ही स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अंतिम अधिसूचना बुधवारी (दि. ११) रोजी प्रसिद्ध केली आहे. एक एप्रिल रोजी राज्य सरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची’ ही स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या नगरविकास विभागाकडे पाठवल्यानंतर अंतिम अध्यादेशाद्वारे नवी नगर परिषद स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पुणे महापालिकेचे सध्याची हद्द ५१६ चौरस किलोमीटर असून, त्यातून दोन्ही गावांची २८ चौरस किलोमीटरची हद्द वगळण्यात येणार आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अनुसार महापालिकेच्या सीमांमध्ये हे फेरफार करण्यात आले आहेत. या गावातील ज्या इमारती, शाळा, भूखंड तसेच पाणीपुरवठा व इतर योजना महापालिकेच्या ताब्यात होत्या, नव्या नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यासाठी मनुष्यबळासह पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र
फुरसुंगी: स. नं. १९३, १९२ पै, १९४ व १९५ पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.
उरुळी देवाची : स. नं. ३०, ३१, व ३२ पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.
पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द
उत्तर कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गांवाची हद्द.
उत्तर पूर्व : लोहगाव, वाघोली या महसूली गावांची हद्द.
पूर्व : मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डेपोची हद्द.
दक्षिण-पूर्व : महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरळी देवाची महसूली गावातील कचरा डेपोची हद्द.
दक्षिण : धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द.
दक्षिण-पश्चिम : पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसूली गावांची हद्द.
पश्चिम कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसूली गावांची हद्द.
पश्चिम-उत्तर बाणेर, बालेवाडी या महसूली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द.