पुणे : शिवसेना नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यातील मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे यांच्या विरोधात विनयभंग आणि चारित्र्यहनन अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 16 जुलै रोजी शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून वसंत मोरे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे आरोप काय?
मनसेचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी १० जुलै रोजी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाबाबत एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. यामधील काही कमेंट्स या अत्यंत वादग्रस्त आणि खालच्या पातळीवरील अश्लील व चरित्रहनन करणाऱ्या आहेत. या कमेंट्स वसंत मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून वसंत मोरे आणि सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेवक बाबू गावस्कर, सुधीर धावडे, अश्विन चोरगे आदी उपस्थित होते.
सुधीर धावडे म्हणाले की, माझे कुटुंबीय हे मानसिकदृष्ट्या अतिशय अस्थिर झाले असून आमच्या जीवाला धोका आहे. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या गुन्हाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या वसंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी ज्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करा, अशी मनसेची मागणी आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.