सासवड : झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत हद्दीत एका बांधकाम व्यवसायिकाने मुरूम, माती दगड टाकून ओढा बुजविण्याचे काम सुरु केले आहे. या व्यवसायिकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा बारामती – पुणे रस्त्यावर सोमवारी (ता. २६) बसून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती झेंडेवाडीच्या सरपंच पूनम झेंडे यांनी दिली.
अनधिकृतपणे जमीन उत्खनन व पाझर तलावातील माती-मुरूम उत्खनन केल्याचे दिसून येत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार रुपाली सरनोबत यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी झेंडेवाडीच्या सरपंच पूनम झेंडे, दिव्याचे सरपंच गुलाब झेंडे, उपसरपंच कौशल्य झेंडे, अजित गोळे, अविनाश झेंडे, अमर झेंडे, मयूर झेंडे, शरद झेंडे, शिवाजी खटाटे, वंदना खटाटे, हनुमंत झेंडे, आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार, झेंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत नैसर्गिक जलस्त्रोत (बंधारा) अज्ञात इसमांनी जेसीबीद्वारे फोडला आहे. या बंधारा गावासाठी महत्वाचा व उपयोगी असलेला पाणीसाठा नष्ट केला आहे. तसेच काही संबंधितांनी शासकीय मालकीच्या ग्रामपंचायतीकडून खर्च केलेले जलसाठे बुजवून टाकले आहेत.
दरम्यान, बांधकाम व्यवसायिकांकडून ओढा गिळंकृत होत असताना संबंधित विभाग व प्रशासन गप्प का बसले हे न सुटणारे कोडे नागरिकांना उलगडत नाही. जेसीबीद्वारे गावासाठी उपयोगी असलेला पाणीसाठा नष्ट केला आहे. त्यामुळे सदर व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील सरपंच पूनम झेंडे म्हणाल्या, ” झेंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत काही व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी मुरूम, माती दगड टाकून ओढा बुजविण्याचे काम सुरु केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना निवेदनहि देण्यात आले आहे. मात्र सदर व्यसायीकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे झेंडेवाडी ग्रामस्थ सोमवारी रस्ता रोको करून आंदोलन करणार आहेत.