पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: पहलगाममध्ये सोमवारी (दि.21) एप्रिल ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रातून विशेषतः शिरुर तालुक्यातील पर्यटकांचे कुटुंबिय चिंतेत होते. शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथील सहा महिला पर्यटक अडकलेल्या होत्या. अखेर प्रशासनाकडून मिळालेल्या सुविधेमुळे हे सर्व पर्यटक सुखरूपपणे शुक्रवारी, दि. 25 रोजी घरी परतल्यामुळे संपूर्ण कुटुंब भारावून गेले होते.
कोंढापुरी येथील उद्योजक भास्कर गायकवाड यांच्या पत्नी मनिषा गायकवाड, तेजल गायकवाड, दिपाली गायकवाड, बहीण ललिता आदक, तसेच हिवरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शरद तांबे यांच्या पत्नी रुपाली तांबे व दीपाली लोखंडे या सर्व महिला मंगळवारी (दि.15) पर्यटनासाठी काश्मीर येथे गेल्या होत्या.
त्या शुक्रवारी (दि.25) परतणार होत्या. मात्र सोमवारी (दि.21) अचानक काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याने 26 पर्यटक मृत पावले. या घटनेची देशभर हळहळ व्यक्त केली जात असल्यामुळे शिरुर तालुक्यातील कुटुंबिय चिंताग्रस्त झाले.
या कुटुंबियांचा पर्यटनाला गेलेल्या महिलांशी संपर्क होत असल्याने सर्वजण भयभीत झाले. यानंतर महिलांचा घरी संपर्क झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्वप्निल गायकवाड यांना तर उद्योजक गायकवाड यांनी भाजपचे शिरुर तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांना याबाबतची सविस्तर माहिती दिली.
गायकवाड यांनी खासदार सुप्रिया सुळे व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याशी तर शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत याबाबत मदतीची मागणी केली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी आमदार अॅड अशोक पवार यांनी देखील या महिलांना मदत करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पर्यटकांना स्वतंत्र विमानाने श्रीनगरहुन मुंबई येथे आणण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार या सर्व पर्यटक महिला गुरुवारी (दि.24) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाल्या. त्यानंतर शुक्रवारी (दि.25) पहाटे पावणे चारच्या सुमारास आपल्या मूळ गावी परतल्याने या सर्व कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आणि चिंताग्रस्त कुटुंबियानी सुटकेचा निःश्वास सोडला.
जम्मू काश्मीर येथे आम्ही गेल्यानंतर सोमवारी (दि.21) दुपारी जी दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण देश हादरलेला असताना कुटुंबातील प्रथम कोणाशी संपर्क झाला नाही, रात्री उशिरा कुटुंबियांशी संपर्क झाला. त्यानंतर आपल्या भागातील अनेक राजकीय व्यक्तींनी आमच्याशी वेळोवेळी संपर्क साधून आम्हाला आधार देवून आमची विशेष काळजी घेत अत्यावश्यक सेवा पुरविली. त्यामुळे आम्ही घडलेल्या घटनेतून पुर्ण बाहेर आलो असून, आम्ही दूर नसल्याचे रुपाली तांबे यांनी सांगत मदत करणाऱ्या जम्मू काश्मीर पोलिस, सैनिक, प्रशासन व राजकीय व्यक्ती यांचे सर्व पर्यटक महिलांनी आभार मानले.