पुणे : पुणे महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखील काम करणाऱ्या एका महिलेचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडीत महिलेला अश्लील शेरेबाजी करून फोनवरुन शारिरीक संबंधांची मागणी करण्यात आली. तसेच, हॉटेलवर येण्याची आणि साहेबांना खुश करण्याची जबरदस्ती करण्यात आली.
याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात पालिकेच्या मुकादम व सॅनिटरी इन्स्पेक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत घडली. या प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुकादम रोहिदास फुंदे (वय-५० रा. चव्हाणनगर, पुणे), सॅनिटरी इन्स्पेक्टर दिनेश सोनावणे (वय-४०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार असून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्या पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर नेमणुकीस आहेत. फुंदे ठेकेदार आणि विभागाचा आरोग्य निरीक्षक म्हणून सोनावणे याच्याकडे जबाबदारी आहे. पीडित महिलेने काही कारणास्तव बदली कामगार लावलेला होता. मुकादम फुंदे याने याबाबत आक्षेप घेतला.
फिर्यादी यांना एकटे गाठून त्यांना ‘तुम्ही तुमचे सफाईचे काम करण्यासाठी हाताखाली माणूस लावला आहे. त्याला कशाला पैसे देता? त्याच्या बदल्यात हॉटेलवर चल, साहेबांना खुश कर आणि बसून पगार घ्या’ असं म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच आरोपीने फिर्य़ादी यांना अश्लील स्पर्श करुन सातत्याने अश्लील शेरेबाजी आणि संभाषण करुन फोनवरुन शारीरिक संबंधाची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.