गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यात शहरातील विविध प्रकारच्या कचर्याची विल्हेवाट लावण्याचा सपाटाच ठेकेदाराने लावला आहे. तालुक्यातील प्रसिद्ध असलेले नारायण महाराज बेट, खुटबाव, खोर नजीकच्या भांडगाव, तांबेवाडी, पडवी, सहजपूर, कासुर्डी या गावांमध्ये दिवसाकाठी जवळपास दहाहून अधिक हायवा ट्रक कचरा रिचवला जात आहे. यामुळे पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाची सोय दौंड तालुक्यात करण्यात आली आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दलाल शेतकर्यांच्या नावाखाली हा कचरा रिचवत आहे. मात्र, यामुळे दौंड तालुक्यातील काही गावे कचर्याचे माहेरघर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दौंड तालुका ठेकेदाराचे सावज झाला आहे. रोज तालुक्यात कमीत कमी दहा गाड्या हायवा आणि जास्तीत जास्त २० गाड्या खाली केल्या जात आहेत. अतिशय उग्र दुर्गंधी असलेली घाण या गाड्यांतून पुणे-सोलापूर महामार्गाने जवळपास ३० किलोमीटर अंतर पार करून येत आहेत. महामार्गावरून जाणार्या वाहनांनाही याचा प्रचंड त्रास होत आहे.
दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये हा त्रास सुरू झाला आहे. कचर्याचा त्रास होऊन देखील कोणी तक्रारसुद्धा करत नाही. तालुक्यात अशाच पद्धतीने शेकडो टन कचरा खाली होईल. याचा
परिणाम नागरी जीवनावर होणार आहे. उग्र वासाने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे ही परिस्थिती गांभीर्याने घेणे गरजचे आहे.
कचऱ्यामुळे आजार वाढले…
सध्या सर्वत्र आजार वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातून शहरातील कचरा दौंड परिसरात आणून टाकला जात आहे. यातील ओल्या कचऱ्यापासून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यावर लवकर आळा बसला पाहिजे. या कचऱ्यापासून खत निर्मितीसारखे उपाय राबवावेत व आमची होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी.
– अखिल बीचकुले, नागरिक, कासुर्डी