उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सायकल दुरुस्ती व विक्री करणारे पांडुरंग मोरे यांचे चिरंजीव गणेश हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे गणेशचे कोरेगाव मूळ व उरळी कांचन परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत गणेश पांडुरंग मोरे (रा. कोरेगाव मोहोळ, ता. हवेली, जि. पुणे) याने सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गणेशने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे. या यशासाठी गणेशला प्रा. युवराज खंडागळे, प्रा. स्वप्नील वालझडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
गणेशचे वडील पांडुरंग मोरे यांचे उरुळी कांचनमध्ये सायकल दुरुस्ती व विक्री करण्याचे दुकान आहे. तर आई मंगल या गृहिणी आहेत. छोटा भाऊ स्वप्नील हा फर्निचरच्या दुकानात काम करीत आहे. गणेशचे प्राथमिक शिक्षण कोरेगाव मूळ येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले तर माध्यमिक शिक्षण उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून सन २०१८ मध्ये पूर्ण केले.
गणेशच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याने काम करण्याचा निर्णय घेतला. एका कंपनीमध्ये त्याने दोन वर्षे कामही केले. मात्र, मोठे होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न हे त्याला झोपू देत नव्हते. मग त्याने पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याला अपयश आले. मात्र, तो खचून गेला नाही. त्याने उमेदीने पुन्हा अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला.
दरम्यान, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते. ध्येय नक्कीच गाठता येते, हे गणेशने सिद्ध करून दाखविले आहे. गणेशने कोणताही क्लास न लावता हे यश मिळवले आहे. मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. गणेशच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर गणेश महाराष्ट्रात कुठेही सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू होणार आहे.
याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना गणेश मोरे म्हणाला की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. तसेच तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर तुम्हाला यश नक्की मिळेल.