चिंचवड : दारू प्यायला पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. नराधम मुलाला न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पी.पी.जाधव कोर्टाने हा निकाल दिला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असे आदेशात नमूद केले आहे.
संजय सोलंकर ( वय ३०, रा. मोरया हौसिंग सोसायटी वेताळ नगर, चिंचवड ) असे शिक्षा झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. तानाजी सोलंकर (वय ५२) असे मयत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाची आजी चंद्रभागा सोलंकर ( वय ७०) यांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. माझा नातू संजय हा घरी दारू पिऊन आला. तो मला व मुलगा तानाजी याला दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. पण आम्ही पैसे दिले नाहीत. याचा राग मनात धरून त्याने आम्हाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच मुलाच्या डोक्यात तांब्याची घागर घालून गंभीर दुखापत करीत खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा तपास विजय गरुड (सध्या मुंबई) यांनी केला. प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे होते. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगटटी यांचा फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्यावर उलटतपासणी मधील पुरावा व वैद्यकीय पुरावा कोर्टाने ग्राह्य धरीत आरोपीस शिक्षा सुनावली. या केसचे कोर्ट पैरवी अधिकारी निल व कोर्ट कर्मचारी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिनेश बांबळे यांनी काम पाहिले.