पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात जेवण करुन रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन तरुणांना अडवून चिकन कापण्याच्या सुऱ्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरातील राज चौकात घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
सुरज आशिष मोरे (वय-२१ रा. कामराज नगर, येरवडा) आणि बलरामसिंग जालिमसंग बावरी (रा. पोतेवस्ती, येरवडा) असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. यापाराकारणी सुरज मोरे याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बीडी कामगार वसाहत येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर रोहित पवार (रा. बीडी कामगार वसाहत, येरवडा), लख्या बनसोडे (रा. वडगाव शेरी, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी सुरज आणि त्याचा मित्र बावरी हे दोघे येरवडा परिसरातील चायनीज सेंटर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन घरी जाताना राज चौकातील बालाजी किराणा दुकानासमोर आरोपींनी दोघांना अडवून कुठे चालला अशी विचारणा केली. त्यावेळी सुरज याने जेवण करुन घरी जात असल्याचे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी दोघांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लख्या बनसोडे याने त्याच्या कमरेला असलेला चिकन कापण्याचा सुरा अल्पवयीन मुलाकडे दिला. त्याने दोघांच्या डोक्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोघांच्या हातावर सुऱ्याचे वार झाल्याने फिर्यादी सुरज आणि त्याचा मित्र बावरी गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करत आहेत.