पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. एक्सप्रेस वेवर एर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पोलिस उपनिरिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या पनवेलच्या हद्दीमध्ये आज पाहटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. सुरज चौगुले(वय-५५) असं अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरिक्षकाचं नाव आहे. सुरज चौगुले हे मुंबईतील विक्रोळी येथील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुरज चौगुले हे मुंबईतील विक्रोळी येथील पार्क साईट पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत होते. चौगुले हे आज पाहटे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या एर्टिगा कारला भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट बॅरियरला जाऊन जोरदार धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की बॅरिअरचा पत्रा कारमध्ये घुसला असून कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चौगुले गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौगुले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.