युनूस तांबोळी
लोणी धामणी : शिरदाळे ते धामणी (ता. आंबेगाव) घाटात रविवारी (ता. ४) मध्यरात्री भीषण अपघात झाला. यामध्ये आयसर टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी बचावले.
अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी (ता. ४) गुळणीवरून बटाटे भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा याठिकाणी निघाला असता, मध्यरात्री एकच्या सुमारास शिरदाळे घाटात उलटला. या अपघातात भूषण धवण (वय २१), सुधिर धोत्रे (वय ३९), शुभम कोथिंबिरे (वय ३०, सर्व रा. श्रीगोंदा) हे तिघे थोडक्यात बचावले. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती नजीक रहायला असणारे सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोऱ्हाडे, विक्रम बोऱ्हाडे, सीमा बोऱ्हाडे यांनी दिली. गेल्या वर्षभरातील हा चौथा मोठा अपघात आहे.
शिरदाळे ग्रामपंचायत, धामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता पुन्हा दोन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून, कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अपघात घडला ती वेळ मध्यरात्रीची होती. असे असताना देखील अपघाताची माहिती सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांना समजताच त्यांचे पती अजित बोऱ्हाडे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना उपचारासाठी तातडीने परगाव येथे दवाखान्यात दाखल केले. अपघातात एकाला गंभीर दुखापत झाली असून, दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. वारंवार अपघात होत असल्याने, संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून त्वरित काम सुरू करावे, अशी मागणी शिरदाळे गावचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी केली आहे.
शिरदाळे ते धामणी या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्यावरून वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुले, महिला, मजूर, शेतकरी यांची कायमच वर्दळ असते. याबाबत दोन्ही ग्रामपंचायती सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देणार आहेत. याची दखल घेऊन कामे मार्गी लावावीत, अशी मागणी जोर धरत आहे.