लोणी काळभोर : मागील चार पाच महिन्यापूर्वी लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात शेतकऱ्यांचे 18 हून अधिक शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पावल्या होत्या. या हल्ल्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी लोणी काळभोर वनसमितीचे अध्यक्ष युवराज काळभोर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाच्या वतीने धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील वनविभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोमवारी (ता.29) धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वन परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे, वनरक्षक अंकुश कचरे, वनसमितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्नाताई वाळके, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, सचिन नारायण काळभोर, शिवाजी काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात वनविभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकरी रामचंद्र गेनू काळभोर यांच्याकडे नुकसान भरपाई म्हणून 84 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तर सुरेश निवृत्ती रूपनर व प्रभू निवृत्ती रूपनर या दोन भावांना अनुक्रमे 11 हजार 250 व 9 हजार रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून देण्यात आला. असा एकूण तीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख 4 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मंगेश सपकाळे म्हणाले की, मागील चार पाच महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्यांवर बिबट्याने हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये शेळ्या-मेंढ्या जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या होत्या. यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी युवराज काळभोर यांनी मागणी केली होती. त्याअनुषंगाने घटनास्थळाचे पंचनामे केले होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानुसार शासनाला प्रस्ताव तयार करून पाठविला होता. आणि सध्या शासनाकडून 3 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही लवकर मिळेल.
युवराज काळभोर यांचे होतेय सर्वत्र कौतुक
लोणी काळभोर वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून युवराज काळभोर काम करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी. यासाठी युवराज काळभोर यांनी वन परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे यांच्या माध्यमातून वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले असून लोणी काळभोर येथील तीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रथमच शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. त्यामुळे युवराज काळभोर यांचे लोणी काळभोर सह परिसरात भरभरून कौतुक होत आहे.