पुणे : राज्यात रब्बी हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून, पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना निविष्ठांकरिता अनुदान मिळणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या विस्तार विभागाचे उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून निविष्ठांच्या अनुदानासाठी रविवारपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले. २०२४-२५ मधील रब्बी हंगाम नियोजनाचा भाग म्हणून अन्न आणि पोषण सुरक्षा, अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, गळीत धान्य पिके या उपक्रमांमधून पीक प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.
त्यापैकी हरभरा, गहू, जवस, करडई, भुईमूग व मोहरी या पिकांकरिता अनुदान मिळणार आहे. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटांमार्फत राबवली जाणार आहेत. प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादित निविष्ठा स्वरूपात अनुदान मिळेल. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला कमाल दोन हेक्टरसाठी बियाणे मिळेल. निविष्ठांच्या पुरवठ्यासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.