राहुलकुमार अवचट
यवत : कमी दाबाने सातत्याने वीज पुरवठा होत असल्याने नागरिक त्रासले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यवत येथील ताम्हणे वस्ती, खैरे वस्तीचा काही भाग कमी दाबाने होत असलेल्या विजेपुरवठ्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेळीच वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा जिजाऊ ब्रिगेडने उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ यांनी महावितरण अधिकारी काकडे यांना दिले आहे.
निळकंठेश्वर डीपी पासून ते खैरे वस्तीवरील देशमुख यांची विहीर असा जवळजवळ २६ पेक्षा अधिक पोलचा लांबचा प्रवास व त्यामध्ये आरथिंगचा तारा गेल्या आठ वर्षापासून पोलवर नसल्यामुळे होणारा वीज पुरवठा हा फार कमी दाबाने होत आहे. या भागाकरिता स्वतंत्र डीपी अथवा पर्यायी व्यवस्था काढून येथील वीज पुरवठा नियमित करावा, अन्यथा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
अनेक वर्षापासून विद्युत महामंडळ यवत शाखा यांच्याशी पाठपुरावा करूनही हा भाग दुर्लक्षित ठेवून नाहक सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. वीजपुरवठा कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने घरातील उपकरणे, विहिरीवरील मोटारी जळणे, रात्री अप-रात्री वीज जाणे, केबल जळाल्यामुळे पाच पेक्षा जास्त दिवस वीज पुरवठा खंडित होणे. असे प्रकार घडत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहेत. यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाणे यासह अनेक कारणांने या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत तात्काळ उपाय योजना न केल्यास दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी येत्या गुरुवारी विद्युत महामंडळ केडगाव/यवत शाखा येथे आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिजाऊ ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.