अहमदनगर : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. ५१२ रुपये किलो कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याला अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. तर, दुसरीकडे ८२५ किलो कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याला १ रुपया व्यापाऱ्याला द्यावा लागला. आता अहमदनगरच्या युवकाने कांद्याचा प्रश्न थेट राष्ट्रपतींच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकरी पुत्राचे पत्र , जसेच्या तसे…!!!
शुभम गुलाबराव वाघ
राजमाता जिजाऊ नगर,
नवीन बस स्टँड समोर, जामखेड, ४१३२०१ ता- जामखेड, जि. अहमदनगर दि-०१ मार्च २०२३
प्रति,
माननीय राष्ट्रपती महोदया, भारत सरकार
श्रीमती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती भवन,
नवी दिल्ली
विषय :- कांदा व इतर पिकांना भाव न मिळणाच्या पिकांवर रोटर फिरवण्यास अनुदान मिळणेबाबत.
महोदया,
आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे, त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे ५०० ने ६०० किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेल्या केळीच्या बागेतही रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रक्कमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय, त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय.
कोणत्याही पिकाचं उत्पन्न घेतलं तरी हीच अवस्था होतेय, म्हणून माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी, हेक्टरी ५००० ते ७००० रूपये लागतात, जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथे शेतमालचं विकला नाही, तर तिथे शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का ?
आज शेतकऱ्यांना २ रुपये एवढी कांदयाची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा सामान्यांना बाजारात २० रुपये किलो दराने मिळतोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिद्यावरचं उपासमारीची वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमान आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर २ हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.
आपला विश्वासू
शुभम गुलाबराव वाघ