भिगवण : उजनी धरणातून गरज नसताना सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करावे व उजनीच्या वरच्या धरणातून उजनीत प्रत्येकी दोनवेळा 10 टीएमसी पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूरसह करमाळा, दौंड, कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.१) दुपारी एकच्या सुमारास भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन केले. यात धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या रास्ता रोको आंदोलनात करमाळा धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर, इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र पाटील, अंकुश पाडुळे, धनंजय डोंगरे, अमोल भिसे, अरविंद जगताप, पराग जाधव, शामराव वाघ, दादासाहेब थोरात, बाळासाहेब मोरे, शरद काळे यांसह अनेकांनी सहभाग नोंदवला. उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले आहे.
यावर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ ६०.६६ टक्के इतकेच भरलेले होते. परंतु, अशी स्थिती असताना देखील ३ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत गरज नसताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. केवळ १० दिवसांच्या अंतराने दुसरे आवर्तन ११ जानेवारीपासून सोडण्यात आले. सोलापूर शहरासाठी पाणी पिण्यासाठी नदीतून पाणी सोडल्याने आज उजनी धरण उणे (वजा) ६५ टक्क्यांच्या खाली गेले आहे. त्यामुळे उजनी धरणासाठी त्याग केलेल्या इंदापूर, करमाळ, दौंड, कर्जत आदी तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांवर अन्याय होत असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.