भोर : सर्वत्र चर्चेत असलेला महाराष्ट्रातील लोकसभेचा बारामती मतदारसंघ याच मतदारसंघातील लक्ष वेधून घेतलेल्या भोर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ हरिश्चंद्री येथे देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर-वेल्हा तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत आमदार संग्राम थोपटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले, महाविकास आघाडीची पहिल्यांदाच सभा भोर तालुक्यात होत असल्याने तालुक्यातील शेतकरी तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन थोपटे यांनी केले आहे. तर जनता मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभेतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हरिश्चंद्री येथील प्रांगणात होणाऱ्या भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे सर्व नियोजन झाले असून, या सभेसाठी सुमारे पंधरा हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हाचे अध्यक्ष नाना राऊत, शिवसेनेचे भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, वेल्हा अध्यक्ष दीपक दामगुदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) भोर तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल, वेल्हा अध्यक्ष दीपक रेणुसे, पोपटराव सुके, दिनकर धरपाळे आदित्य बोरगे यांच्यासह तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चौपट मताधिक्याने सुप्रिया सुळेच निवडून येणार
भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित चांगल्याप्रकारे काम करणार असून, यावेळी चौपट मताधिक्याने सुप्रिया सुळेच निवडून येणार असल्याचा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.
– रवींद्र बांदल, भोर तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
मतदार सुज्ञ, ते योग्य तो निर्णय घेतील
मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील तर लोकसभेला शिवसेना (उबाठा) आघाडी सोबत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तर तिन्ही पक्ष सोबत असल्याने मोठ्या मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– ज्ञानेश्वर शिंदे, भोर तालुका अध्यक्ष, शिवसेना (उबाठा)