शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड तालु्क्यात बिबट्यांची दहशत आणि रानडुकरांचा धुकाकूळ सूरू असतानाच आता मोर, लांडोऱ्या पिकांचे नुकसान करत आहेत. ते रब्बी हंगामातील उगवलेल्या हरभरा आणि गव्हाचे कोंब, कोवळी पाने फस्त करू लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सध्या या चार तालुक्याच्या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबटे दिवसाही शिवारात फिरकू लागले आहेत. सायंकाळनंतर तर शेतकरी एकटे शेतात जायला घाबरत आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करत असतानाच अनेक शेतकऱ्यांनाजखमी केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. रात्री शेतात पाणी देणेही धोकादायक झाले आहे.
बिबट्या बरोबरच रानडुकरे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान करत आहेत. फक्त डोंगरानजीकच्या नव्हे, तर गावानजीकच्या शेतीत येऊन डुकरांनी भुईमूग फस्त केले. ऊसाचेही मोठया प्रमाणात नुकसान करत आहेत. डुकरांचे कळप ऊसा्च्या शेतात आतवर शिरून ऊस खात पीक उदध्वस्त करत आहेत. तसेच डुकरे दिवसाही ऊसात दडून बसू लागली आहेत. शेतकऱ्यांची चाहूल लागतातच 25 ते 30 डुकरांचा कळप उभ्या पिकातून सैरावैरा पळत सुटतो. उभे ऊस आडवे होऊन जात आहेत. रात्री तर शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. रानडुकरांबरोबर वानरे शेतातील भुईमूगाच्या शेंगा फस्त करत आहेत. सातत्याने हे प्रकार सुरू आहेत. कितीही हुसकावले तरीही वानरांची संख्या मोठी आहे.
पुरेशा पावासाअभावी शेतकरी त्रस्त आहेत. तरीही मध्यंतरी काही प्रमाणात झालेला पाऊस आणि उपलब्ध पाण्यावर आता शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या आहेत. बहुतेक ठिकाणी ज्वारी, गहू, हरभऱ्याची उगवणी चांगली झाली आहे. मात्र, मोठ्या संख्येने असलेले मोर आणि लांडोऱ्या उगवून आलेल्या गव्हाचे कोंब, कोवळी पाने खाऊन टाकत आहेत. वरचे शेंडेच खुडले गेल्याने गहू, हरभऱ्याच्या वाढीवर निश्चितच परिणाम होणार आहे. बिबटे, रानडुकरांची दहशत, वानंरांचा त्रास आणि आता पाहायला चांगले वाटणारे मोर- लांडोऱ्या नुकसान करू लागल्याने शेतकरी हवावदिल झाले आहे.
सध्या शेतातील ओलीवर शेतकरी गहू, हरभरा पिके घेत आहेत. मात्र, डुकरांकडून पेरलेले दाणे अन मोर उगवलेल्या पिकाचे शेंडे खाऊन टाकले जात आहेत. आधीच खरिपाचे पीक कमी प्रमाणात मिळाल्याने आता या रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत. वनविभागाने लांडोरी व मोरांसाठी अन्न व पाण्याचा बंदोबस्त करून शेतीचे नुकसान थांबवावे.
मानसिंग पाचुंदकर, अध्यक्ष, आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॅाग्रेस