पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC) आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बळिराजा मुदत कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना शेतीविषयक विविध कामांसाठीच्या खर्चासाठीची गरज तत्काळ पूर्ण केली जाणार आहे. ही योजना लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी शुक्रवारी दिली. जिल्हा बँकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या नवीन योजना आणि बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गाडे बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, बळिराजा योजनेत गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत कर्जदार सभासद शेतकऱ्यांना प्रति एकरी दीड लाख रुपये आणि कमाल सात लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जाणार आहे. तसेच या कर्जासाठी सभासदांना दर साल दर शेकडा (द. सा. द. से.) १०.५ टक्के टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.
याशिवाय केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेत कृषी व पूरक सेवा, प्रक्रिया उद्योग तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायाभूत सुविधा निधी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजनेतंर्गत कर्जपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेने नोकरदारांसाठी दर साल दर शेकडा ८ टक्के व्याजदराने गृहकर्ज वाटप करण्यास सुरूवात केली आहे. यानुसार आतापर्यंत १६५ कोटींचे गृह कर्ज वाटप करण्यात आले आहे. याशिवाय १२२ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्जवाटप करण्यात आले आहे. नोटबंदी काळातील 22 कोटी रुपयांच्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा अद्याप बँकेकडे तशाच पडून आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याचे यावेळी दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.