दौंड (पुणे): म्हशींचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सीटोसिन औषधाचे इंजेक्शन देऊन, त्याचा गैरवापर करीत प्राण्यांवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना दौंड शहरातील पानसरे वस्ती परिसरात उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने पानसरे वस्ती येथील म्हशींच्या गोठ्यावर छापा मारत औषधे जप्त केली आहेत.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत (रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, बावधन, पुणे) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी दिनेश दत्तात्रय हिरणावळे (रा.हनुमान मंदिराजवळ, वडार गल्ली, दौंड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123 ,274,3(5),11(3),12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील पानसरे वस्ती भागात घडली. 7 फेब्रुवारी रोजी, पानसरे वस्ती येथील दिनेश हिरणावळे हे त्यांच्या गोठ्यातील म्हशींना दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीन औषधाचे इंजेक्शन देऊन त्याचा गैरवापर करीत असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 8 फेब्रुवारी रोजी आपले सहकारी औषध निरीक्षक सचिन बुगड, अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर तसेच दौंड पोलिसांचे पथक सोबत घेत पानसरे वस्ती येथील गोठ्यावर छापा मारला.

त्यावेळी गोठ्याचे मालक दिनेश हिरणावळे तेथे उपस्थित होते. गोठ्याची तपासणी केली असता त्या ठिकाणी हिरणावळे यांच्या मालकीच्या 40 म्हशी आढळून आल्या. तसेच 100 मिली मापाच्या 3 लेबल नसलेल्या वापरलेल्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या. त्याचप्रमाणे एक 20 मिली ट्रान्सपरंट लिक्विड असलेली औषधाची बाटली व चार वापरलेले सिरींज, तसेच एक निडल सापडली. मिळालेल्या बाटल्या, औषधांबाबत दिनेश हिरणावळे याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचे औषध ऑक्सिटोसीन असल्याचे सांगितले. सदरच्या औषधाचा वापर हा गोठ्यातील म्हशींना इंजेक्शनद्वारे देऊन त्यांच्याकडून जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन करून लोकांना विक्री करीत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सदरचे औषध (110 बाटल्या, 40 रु. प्रति ) त्यांनी आठ दिवसांपूर्वी समीर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतले असल्याचे कबूल केले. हिरनावळे यांना इतर बाटल्यांबाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. संबंधित औषध खरेदी, साठवणूक व विक्री बाबतचा औषधे व सौंदर्य प्रशासन कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवाना सुद्धा त्यांच्याकडे नाही. गोठ्यातून जप्त केलेल्या औषधांच्या बाटल्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.
जनावरांना पान्हा करण्यासाठी सदर औषधाचा गैरवापर होतो. इंजेक्शनमुळे जनावरे जास्त प्रमाणात दूध देतात. हे दूध मानवी आरोग्यास हानिकारक असून त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर विषारी परिणाम होतात. श्रवण कमजोरी, दृष्टी हिनता, पोटाचे आजार, गरोदर स्त्रीचा रक्तस्त्राव व अनैसर्गिक गर्भपात इत्यादी गंभीर आजाराची शक्यता असते. ऑक्सीटोसीन इंजेक्शन हे हार्मोन्स असून त्याचा वापर प्रसूती सुरळीत करण्यासाठी होतो. हे सर्व माहीत असतानाही दिनेश हिरणावळे यांनी सदरचे इंजेक्शन गैरमार्गाने मिळविले, प्राण्यांना इंजेक्शनद्वारे औषध देऊन प्राण्यांवर कृरतेने अत्याचार केला असेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.







