पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात अवैधरीत्या पहाडी पोपट (Alexandrine Parakeet) या वन्यजीव पक्ष्यांची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी वनविभागाने सीमा शुल्क विभागाच्या मदतीने कारवाई करुन दोघांना अटक केली आहे.

पहाडी पोपटाची पुणे रेल्वे स्थानक परिसरात खरेदी विक्री होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. वन विभागाने सीमा शुल्क विभागाच्या ही मदतीने कारवाई केली. या कारवाईत शेख सरफराज शेख खदीर यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती तो वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम २, ३९, ४८ (अ), ४९, ५० व ५१ अंतर्गत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणात तपासादरम्यान सचिन सुजित रोजोरिया याचे नाव पुढे आले. त्यानुसार त्यालाही पुण्यातील सांगवी फाट्यावर वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्यासही अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना एक दिवसांची वनकोठडी सुनावली.

त्यानंतर दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर कोर्ट, पुणे येथे हजर केले असता न्यायालयाने २१ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार शेख सरफराज शेख खदीर व सचिन सुजित रोजोरिया यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी वैभव बाबर, प्रमोद रासकर, वनरक्षक काळुराम कड, अनिल राठोड, मधुकर गोडगे, ओंकार गुंड, विनायक ताठे, रमेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वन्यजीव तस्करी किंवा बेकायदेशीर वृत्तींविषयी माहिती असल्यास नागरिकांंनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी केले आहे.







