पुणे: सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं मोठा फटका बसत आहे. एका बाजूला उत्पादनाचा खर्च वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत आहे. बारा वर्षांपूर्वी ४३५० रूपये सोयाबीनचे दर होते तर आता ४ हजार रूपये क्विंटला भाव मिळत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात आल्यानंतर सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला ४८९२ प्रति हमीभाव जाहीर केला असताना सध्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये ३५०० ते ४१ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकावे लागत आहे. खरीप हंगामात सुरुवातीला सोयाबीन बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ लागले आहे. सन २०१२ मध्ये सोयाबीनला ४३५० रूपयाचा दर मिळत होता. त्याच्या पावत्या देखील शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. दरम्यान, बारा वर्षात शेतीमालाला भाव वाढण्याऐवजी कमी झाल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत असल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे आपण भाषणांमधून ऐकत आहोत, आणि शेतकऱ्यांना राजाही म्हटले जाते. मात्र, याच राजाची सरकारकडून प्रचंड चेष्टा सुरू आहे. बारावर्षांपूर्वी आजच्या पेक्षा दर अधिक असणे लाजिरवाने आहे. सरकार कोणतेही आले तरी ते शेतकऱ्यांचा विचार करत नाही. आता सोयाबीनचे दर बघून लाज वाटावी, अशी स्थिती आहे. सोयाबीनचे दर कमी होतात मात्र, तेलाचे दर वाढतात, ही गोष्ट खटकणारी आहे. सरकारने लाडक्या बहिनीला पैसे देण्यापेक्षा हे भाव वाढले तरी बहिनीचे प्रपंच चांगले चालतील.