भोर : यंदा सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली असली, तरी प्रति किलोला बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना खर्चही परवडेना झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भोर तालुक्यात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर असते. सोयाबीन पीक पाऊस मध्यम, तसेच जास्त असला तरी उत्पन्न चांगले देत असल्याने भोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात क्षेत्र कमी करून सोयाबीन पिकाच्या पेरणीत मागील दोन-तीन वर्षांपासून वाढ केली आहे.
उन्हाळा असो किंवा पावसाळा तालुक्यात सोयाबीन पिकासाठी पोषक वातावरण असल्याने शेतकरी साधारणतः ४ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करीत असतात. यंदा खरिपातील पिकांना पावसाने उत्तम साथ दिल्याने भातपिकासह सोयाबीन पिके जोमात आले आहेत. सध्या सोयाबीनची कापणी उरकली असून, मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मात्र, सोयाबीनला प्रतिकिलो ४० रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पन्नासाठी होणारा खर्च मिळेना, अशी परिस्थिती आहे.
साधारणतः सोयाबीनला प्रतिकिलोला ५० ते ५५ रुपये बाजारभाव असेल, तरच खर्च जाऊन शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात फायदा मिळतो. मात्र, बाजारभाव नीचांकी झाल्याने शेतकऱ्यांचा तोटा होत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले .