-संदीप टुले
पुणे : दौंड तालुक्यातील परिसरात सध्या उसाची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी कामगारांकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक कोण थांबविणार, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. ऊसतोडणी कामगार, ट्रॅक्टरचालक व ऊस तोडणी यंत्र चालक मालक हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे. याकडे कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमुळे सर्व साखर कारखान्यांचा ऊस गाळपाचा गाळप हंगाम एक महिना उशीरा सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊस शेतात पडून आहे. तसेच ऊस तोडल्यानंतर लगेच गव्हाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांची ऊस तोडण्यासाठी लगबग सुरू आहे. पण याचाच फायदा उठवत यावर्षी ऊस जास्त आहे. तोडणी कामगारांची कमतरता, ऊस तोडणी यंत्राला भरपूर काम असल्याचे निमित्त करून अनेक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी हजारो रुपयांची मागणी करत आहेत.
परिसरात भीमा पाटस (निरानी ग्रूप), श्रीनाथ म्हस्कोबा, दौंड शुगर आदी कारखान्यांकडून ऊस तोडणी सुरू आहे. मात्र, काही कारखान्यांच्या मजुरांकडून ऊस तोडण्यासाठी एकरी तीन ते पाच हजार रुपये उकळले जात आहेत. अगदी प्रोग्रॅमप्रमाणे ऊस तोडणी येऊनही हजारो रुपयांच्या मागणीमुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे. ऊस तोडणी कामगार, ट्रॅक्टरचालक व ऊस तोडणी यंत्राचा चालक मालक, यांची साखळी तयार झाल्याने सध्या परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू आहे.
आताच कारखाने सुरू होताच असा प्रकार घडत असल्याने पुढे मार्च-एप्रिलमध्ये यापेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्यानंतर एकरी दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम तोडणीसाठी मागितली जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. काही ऊसतोड कामगार तर उसाला वाढ नाही म्हणून ही उसाचे फड अर्धवट सोडण्याची प्रकार घडत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान तर होते, यामुळे शेतकरी हतबल होऊन पैसे देऊन ऊस तोडून घ्यावा लागत आहे.
ऊसतोडणीसाठी कारखाना प्रशासनाने प्रति एकर ठरवून दर द्यायला हवेत. शेतकऱ्यांकडे हजारो रुपयांची मागणी होत असताना शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवणारे साखर कारखान्याचे प्रतिनिधी, नेते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत? याकडे कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा कारखाना प्रशासनाविरुद्ध आवाज उठविला जाईल.
-दिलीप हंडाळ, मा. सभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड