शिरूर : रब्बी हंगामातील मुख्य ज्वारीचे पीक आता हुरड्यात आहे. शिरूर तालुक्यातील शेतशिवारातील बळीराजा पिकांचे पाखरांपासून संरक्षण करण्यात व्यस्त राहत आहेत. काही ठिकाणी ज्वारीचे पिक काढणीला आले असून, चिमणी-पाखरांची गर्दी शेतशिवारावर दिसू लागली आहे. हा किलबिलाट हाकलण्यासाठी व पिकांची राखण करण्यासाठी तयार करण्यात येणारा माचवा आता दुर्मिळ झाला आहे. शेताच्या बांधावरूनच आता पिकांची राखण केली जात असून, शेतकऱ्यांचे शस्त्र म्हणून ओळख असणारी गोफण आता दिसेनाशी झाली आहे.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रांजणगाव गणपती, सोनेसांगवी, बुरूंजवाडी, गणेगाव खालसा, मलठण, कान्हूर मेसाई, खैरेनगर, खैरेवाडी, धामारी या परिसरात ज्वारीचे पिक घेतले जाते. रब्बी हंगामाच्या सुरवातीस पेरणी केलेल्या पिकाला आता दाणा भरू लागला आहे. ज्वारीचे दाणे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिमणी पाखरे येऊ लागली आहेत. शेतकरी या पिकाची राखण करताना दिसू लागली आहेत. काही ठिकाणी या पिकाची काढणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्वारीच्या पिकात माचवा करून पिकाची राखण करण्याचे चित्र आता या परिसरात दुर्मिळ झाले आहे.
गोफणीचा मागणी नाही…
आता गोफण देखील दुर्मिळ झाली आहे. प्रत्येक गावच्या आठवडे बाजारात गोफण विक्रीस येत होती. परंतु, ती आता दुर्मिळ झाली आहे. कारण ज्वारीचे पीक कमी झाले आहे. पर्यायाने गोफणीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गोफण देखील तयार केल्या जात नाहीत.
ज्वारीची भाकरी होणार महाग
शिरूर तालुक्याच्या काही भागातच ज्वारीचे पीक घेतले जाते. सध्या ज्वारीचे पीक कणसे भरण्याच्या तयारीत आहेत. थंडीचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम या पिकावर झाला आहे. परिणामी, ज्वारीची आवक कमीच राहणार आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत राहून ज्वारीची भाकरी महाग होणार असल्याची चिन्हे आहेत.
बदलत्या वातावरणाचा परिणाम ज्वारी पिकावर
‘बदलत्या वातावरणाचा परिणाम ज्वारी पिकावर झाला आहे. अधिक काळ धुके पडल्याने काही ठिकाणी ज्वारीच्या गोंडे लाल झाले आहेत. त्यातून या आगात बाजरीचे पिक लाल होतील. तर मागास बाजरीचे पिक चांगले आहे. त्यामुळे येथे पांढरी व पिवळ्या रंगाच्या शुभ्र बाजरीचे पिक तयार होईल’
– दादा खर्डे, शेतकरी, कान्हूर मेसाई.