केडगाव : चालू वर्षी शेतकर्यांना टोमॅटो पिकांकडून अपेक्षा होती; मात्र, सध्या बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
दौंडच्या गाडेवाडी, बोरिबेल, नंदादेवी, खडकी, मलठन अशा भागात शेकडो एकरांवर टोमॅटोची लागवड झाली आहे. सध्या टोमॅटोची तोडणी सुरू झाली आहे. मात्र, टोमॅटोला प्रतिकॅरेट 200 रुपये दर मिळत आहे. या भागातील शेतकर्यांनी विविध जातीतील टोमॅटोची लागवड केली आहे. बहारदार पीक येऊनही टोमॅटोला सध्या 10 ते 12 रुपये किलो दर मिळत आहे. नव्यानेच तोडणी सुरू झालेल्या टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस, करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
गेल्या वर्षी टोमॅटोला केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. अनेकदा उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतातील पिकांत जनावरेही सोडण्यात आली होती. चालू वर्षी दौंड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.
पुणे, सोलापूर, मुंबई, कर्नाटक आदी शहरांत टोमॅटोची विक्री केली जाते. डिझेलच्या वाढत्या महागाईचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. शेती मशागत, सरी काढणे, रोपे, ड्रीप, काठी, सुतळी बांधणे, औषध फवारणी, खते, मजूर यासाठी एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो.
मनी प्लँट म्हणून ओळख असलेले टोमॅटोतून चांगले उत्पन्न मिळाले तरच दोन वर्षांचा झालेला खर्च निघेल, असे मत शेतकरी व्यक्त करत आहे. तर कॅरेटला कमीत कमी 300 रुपयांच्या पुढे दर मिळाला तरच उत्पादन खर्च निघणार असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.