योगेश मारणे
न्हावरे, ता. २६ : चासकमानच्या डाव्या कालव्याचे पाणी मिळत नसल्यामुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील न्हावरेसह पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अन्यायकारक पाणी वाटप कारभाराचा निषेध केला. तसेच न्हावरे येथील मुख्यचौकात आज (दि.२६) सकाळी आंदोलन केले.
शिरुर तालुक्यासाठी वरदान असलेले चासकमान धरण, धरण पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्यामुळे शंभर टक्के भरल्यामुळे धरणाच्या कालव्यातून जवळपास महिन्याभरापासून पाणी सोडले आहे. मात्र, अद्यापपर्यंत कालव्याचे पाणी शिरूर तालुक्यातील ‘टेल’कडील भागाला पोहचले नसून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे न्हावरे आंबळे, उरळगाव, चव्हाणवाडी, निमोणे, गुनाट, निर्वी, आंधळगाव आलेगाव पागा, कोकडेवाडी, कोळगाव डोळस इत्यादी लाभक्षेत्रातील गावांमध्ये शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे येथील परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित संतप्त शेतकरी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी चासकमान प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत न्हावरे (ता.शिरूर) येथे मुख्य चौकात निषेध सभेचे आयोजन करून आंदोलन केले.
पाणी सोडण्याचा नियम टेल-टू-हेड असताना चासकमान प्रशासनाने शिरूर तालुक्यातील चासकमान लाभक्षेत्राच्या टेलच्या भागावर पाणी वाटपाबाबत कायमच अन्याय केला आहे व हेडच्या भागालाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत ऐन पाणी टंचाईच्या काळात टेलच्या भागातील शेतकरी चासकमानच्या आवर्तनापासून वंचित आहे. परिणामी, शेतातील उभी पिके अनेकदा जळून गेली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी चासकमान पाटबंधारे उपविभाग क्र .४ शिरुरचे उपअभियंता अभिमन्यू मासाळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. पुढील आठ दिवसात चासकमानचे आवर्तन न्हावरे परिसरासह टेलकडील भागात सोडण्यात येईल, असे आश्वासन मासाळ यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
याप्रसंगी भाजपचे युवा नेते राजेंद्र कोरेकर, भाजपचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुभाष कांडगे, माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच अरुण तांबे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागेशराजे निंबाळकर, निमोणेचे माजी सरपंच विजय भोस, डी .डी. शिंदे, संतोष काळे, माजी सरपंच ज्ञानेश्वर बहीरट, गोरक्ष तांबे, शिवाजी घोलप, सागर खंडागळे, सुरेश कोरेकर, नितीन खंडागळे, बिरदेव शेंडगे, अनंत काळे, बापूसाहेब काळे,कैलास कोरेकर, पोपटराव शेलार, संभाजी कांडगे यांच्यासह शेतकरी बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.