विजय लोखंडे
वाघोली, (पुणे) : वाघोली हे पुणे शहराचे पुर्वेकडील मोठे उपनगर म्हणून विकसित होत आहे. याठिकाणी शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरु करावा, अशी मागणी राज्य कृषी पणन मंडळ व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी केली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद उपस्थित होते.
रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले की, वाघोली, खराडी व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झालेले आहे. या भागातील नागरिकांना पुणे मार्केटयार्ड येथील मुख्य बाजारपेठेतील शेतीविषयक माल व इतर वस्तू खरेदीसाठी जाणे सोयीचे होत नाही. त्यामुळे या भागामध्ये विविध बाजारपेठा देखील विकसित होत आहेत.
तसेच ग्राहकांची संख्या देखील प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस आंबा रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर वाघोली येथील बाजारतळाच्या जागेमध्ये शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरू केल्यास ग्राहकांना रास्त दरामध्ये आंबा उपलब्ध होईल व आंबा उत्पादकांना देखील त्यांच्या मालास रास्त भाव मिळेल.
तरी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने वाघोली (ता. हवेली) येथील बाजारतळाच्या जागेमध्ये शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव लवकरात लवकर आयोजित करावा, अशी मागणी सातव पाटील यांनी केली आहे.
शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव वाघोलीत सुरु केल्यास त्याचा फायदा परिसरातील लोणीकंद, भावडी, आव्हाळवाडी, केसनंद, कोलवडी, वाडेबोल्हाई, बकोरी तसेच पूर्व हवेलीतील अनेक गावांना होणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांची मागणी लोकउपयोगी रास्त असून संबंधित खात्याने या विषयाबाबत निवेदनाची दखल घेऊन शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव लवकरात लवकर सुरु करावा, यासाठी आम्हीही आग्रही आहोत.
-रविंद्र कंद, माजी उपसभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे