पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदार व दुबार विक्री करणारे व्यापारी यांच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना मांजरी उपबाजारात बंदी घालावी, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत असून, आज आठव्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या आंदोलनाला गुरुवारी (दि.८) जाहीर पाठींबा देण्यात आला. यावेळी बोलताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड म्हणाले, मांजरी उपबाजार हा शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारीत आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो. परंतु या बाजारात दुबार विक्री करणारे व्यापारी व खोतेदार यांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याने शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.
तसेच काहीवेळा तर माल विकला सुद्धा जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून मराठा महासंघ या आंदोलनात शेतकऱ्याच्या पाठीशी असून, दुबार विक्री करणारे व्यापारी व खोतेदार यांना तातडीने बंदी घालावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, शेतकरी संघटनेचे सूर्यकांत काळभोर, मराठा महासंघ युवती तालुकाध्यक्ष पुजा सणस, कोलवडी विविध कार्यकारी सोसायटीचे मा. चेअरमन भाऊसाहेब गायकवाड, शंभुभक्त सुभाष गायकवाड, शिवसेना शाखा प्रमुख राजाराम गायकवाड अमित कांचन व आंदोलक शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.