पुणे : अमरावती जिल्ह्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागील २-३ दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे सुमारे १८ हजार हेक्टरवरील शेतीपिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील देवळी, हिंगणघाट, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४ हजार ४२३ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून त्यामध्ये हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली, लाखनी तालुक्यातील गहू, हरभरा, जवळ आणि भाजीपाला आदी पिकांचे १ हजार ६९१ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
तसेच धामणगाव तालुक्यात २ हजार ५७५ हेक्टवरील पिके बाधित झाली असून त्यामध्ये गहू, भाजीपाला हरभरा, व फळपिकांचा समावेश आहे. तर नागूपर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८ हजार ९०० हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. गहू, हरभरा, कापूस, भाजीपाला, संत्रा, मोसंबी, रब्बी सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.