पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजारात रविवारी (दि. १३) भोसे (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) गावातील शेतकरी विजय भिकाजी शिंदे यांच्या संत्र्याला उच्चांकी २२२ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला. गेल्यावर्षी संत्र्याला प्रति किलो १०० ते १५० रुपये भाव मिळाला होता. उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला. मार्केट यार्डातील मे. तुळजाराम पंथाराम बनवारी येथील युवराज काची यांच्या गाळ्यावर संत्र्यांची विक्री झाली.
पुणे उपनगरांसह गोवा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, रत्नागिरी, लोणावळा अशा ठिकाणी या संत्र्याला मोठी मागणी आहे. सध्या फळबाजारात अहिल्यानगर परिसरातून दररोज १५ ते २० टन संत्र्याची आवक होत आहे. पिंपळी, उजनी, करंडी, पारनेर, काथुर्डी आदी गावांतूनही संत्री बाजारात येत आहेत.