पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या चैतन्य महाराजांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चैतन्य महाराजांसह त्यांच्या दोन भावांनाही देखील पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी अशी आहेत. अटकेच्या कारवाईबाबत विचारले असता चैतन्य महाराज यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आम्हाला ताब्यात घेतले होते व नंतर सोडून दिले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चैतन्य महाराज यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. संबंधित कंपनीचा रस्ता पोकलेनने खोदला. या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. घराशेजारीच असलेल्या कंपनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद सुरु आहेत. याच वादातून चैतन्य महाराजांनी रात्री त्यांच्या दोन भावांसह रस्ता बेकायदेशीरपणे खोदला. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ही अटक करण्यात आली. चैतन्य महाराज वाडेकर यांनी मात्र आपल्याला अटक झाली नसल्याचे सांगितले आहे.
चैतन्य महाराज हे म्हाळुंगे परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या घराजवळ एक कंपनी असून तिथल्या वाटेवरून त्यांच्यात वाद सुरु आहेत. बुधवारी (दि. २) रात्री कंपनीत जाणारा रस्ता चैतन्य महाराज यांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यानंतर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांनी चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तिघांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले होते, नंतर अटकही केली.