पुणे: भांबोली (ता. खेड) येथे वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. परंतु, त्याने यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृतपणे आमच्या जागेत चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा टाकून तेथे बांधकाम केले. ते बांधकाम पाडण्याचे आदेश भूमी अभिलेख विभाग व न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट आमच्या कुटुंबीयांवर बिल्डरने दडपशाही केली आहे. माझा अपंग भाऊ अमोल वाडेकर यांना शारीरिक व्यंगावरून अपमानकारक वागणूक दिली, तसेच आमच्या जागेतील त्यांचे अतिक्रमण आम्ही काढले म्हणून आमच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट आहे, असा आरोप प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी केला आहे.
चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह त्यांचे दोन भाऊ अॅड. अमोल व प्रमोद वाडेकर आणि नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी त्यांची बाजू पुण्यात पत्रकार परिषद घेत मांडली. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीएच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधित बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका कंपनीचा रस्ता खोदल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतू असल्याचाही आरोप चैतन्य महाराज वाडेकर यांनी केला आहे.
चैतन्य वाडेकर म्हणाले की, भांबोली येथे सर्व्हे नंबर ५६ आणि गट नंबर २४५ मध्ये वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या क्षेत्रापैकी २ हेक्टर क्षेत्र विक्री करताना माझ्या कुटुंबाने केवळ २२० फूट फ्रंट असलेले उत्तर-दक्षिण लांबीचे क्षेत्र विक्री केले होते. परंतु, या बांधकाम व्यावसायिकाने त्यापेक्षा अधिक जागेवर बेकायदेशीरपणे ताबा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व्हे नंबर ५६ पैकी ७९ आर क्षेत्राची खरेदी आमच्या आजोबांच्या नावे असून त्याची मालकी व ताबा आमच्या कुटुंबाकडे होता आणि आहे. परंतु, या क्षेत्राची नोंद भूमि अभिलेखात आमचे नावे न झाल्यामुळे आमच्या कुटुंबाने पुणे भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक यांच्याकडे २००७ साली रेकॉर्ड दुरुस्तीसाठी अपील दाखल केले होते. याप्रकरणी आमचे अपील मान्य करून पुणे भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक यांनी याप्रकरणी दुरुस्तीचे आदेश दिलेले आहेत.