पुणे : राज्याच्या राजकारणात सद्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच काल सुनेत्रा पवार यांनी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
“मायबाप जनतेने साथ दिली. आशिर्वाद दिला. काही विरोधकही पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहतात. यात सगळया प्रश्नांची उत्तर आली” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “पूजा खेडकर प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडतय. सरकारने जबाबदारी घ्यावी. कुठलीही बातमी लीक होता कामा नये. व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. चॅनलवर रोज काहीतरी नवीन दिसतय. सरकारसाठी हे फार चांगलं नाही असं मला वाटतं. सरकारने शांततेने, डीपमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे. रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते? सरकार काय करतय?” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.
सुनेत्रा पवार काल मोदी बागेत आलेल्या, त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी काल सुप्रीम कोर्टात होते. आम्ही पाठपुरावा करतोय. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानते. आमचा युक्तीवाद त्यांनी ऐकून घेतला. आम्हाला ऑगस्टची तारीख दिलीय. उद्धव साहेब, पवार साहेबांकडून पक्ष, चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं. त्या बद्दलची ही केस आहे.
केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बोलतात. आमच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे वकील आमचेच आहेत. क्लायंट कधी कोर्टात दिसत नाही. अदृश्य शक्ती यंत्रणा चालवते” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पैसा येतो-जातो शेवटी नाती महत्त्वाची..
सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाची आहेत. सत्ता, पैसा येतो-जातो शेवटी नाती महत्त्वाची असतात.”