पुणे: पुण्यातील जुनी वडारवाडी परिसरात मुलाने गाडी जोरात रेस केल्याच्या शुल्लक कारणामुळे 4 जणांनी मुलासह त्याच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रथम चव्हाण (२५), रणवीर कांबळे (१८), ऋषिकेश पवार (२५) आणि वैभव ओरसे (२५) यांना अटक केली आहे. रविवारी रात्री आरोपींनी पीडितेच्या घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पोलिस तपासात असे दिसून आले की, मुलगा त्याची बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने गाडी जोरात रेस केली. या कारणामुळे आरोपीने तरुणाला शिवीगाळ केली.
दरम्यान, तरुण घरी पळून आला असता आरोपी त्याचा पाठलाग करत त्याचा घरी पोहोचलेवर त्यांनी मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आईने मध्यस्थी केली असता, आईवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. मुलगा आणि बायकोला वाचवण्यासाठी वडील दत्तात्रय घोगल्लुमध्ये पडले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. भांडणाचा आवाज आल्याने शेजारी प्रशांत जोशी, राहुल जोशी आले असता, आरोपींनी त्यांनाही जबर मारहाण केली.
फिर्यादी दत्तात्रय घोगल्लु हे तेथून पळत पांडवनगर पोलीस चौकीत गेले असता. चौकीत कोणीही नव्हता. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर पोलिस आले आणि त्यांनी आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दादा पवार तपास करीत आहेत.