वाघोली : जमिनीचा अवैध खरेदी खताचा दस्त तयार करुन गटातील सर्व जमीन स्वत:च्या नावावर करुन 98 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी महिलेसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2015 ते 15 जुलै 2024 या कालावधीत केसनंद येथील गट क्रमांक 102 मध्ये घडला आहे.
याबाबत शहनवाज अली मोहंमद सोमजी (वय 53, रा. चौथा मजला, सुयोग फयेजन, ढोले पाटील रोड, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब तुकाराम अवताडे (वय-58 रा. मु.पो. शिरसवडी), कविता पोपट ढवळे (वय 34, रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या केसनंद येथील गट क्रमांक 102 मधील मिळकती मधील 3 हेक्टर 50 आर क्षेत्र मुळ खरेदीखतामध्ये नोंदणीकृत दस्ताने चुक दुरुस्त केली होती. चुक दुरुस्ती दस्ताने वगळण्यात आलेल्या 1 हेक्टर 93.2 आर क्षेत्र हे फिर्यादी यांच्या दिराच्या नावावर होते. त्यानंतर हे क्षेत्र प्रफुल्ल काळुराम शिवले यांच्या नावावर करण्यात आले होते. हे सर्व माहित असताना देखील आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांनी विश्वासाने दिलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरफायदा घेतला. आरोपींनी बेकायदेशीर रित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी गट क्रमांक 102 मधील 60.5 क्षेत्राचा दुबार व अवैध खरेदी खताचा दस्त करुन फिर्यादी, त्यांचे दिर तसेच प्रफुल्ल शिवले यांची 98 लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.