लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुंजाळ माळ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट एशियन पेंट तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.24) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून सुमारे साडे 3 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वयंम मिरुनाथ सिंग (वय 33 रा.माऊटन रागा प्लॅट नं. 106 उरुळी देवाची ता. हवेली, मुळगाव पोस्ट ड्रेली मारिया, तहसील दरौली जि. सीवान राज्य बिहार) व शिवकुमार महेंद्र पासवान रा. पेट्रोलपंपाशेजारी हडपसर, मुळगाव मेहसी, रेहनरक्षा, जि. जबलपुर राज्य बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष हरिश्चंद्र जयस्वाल (वय 41, रा. 16 सोहम सानिध्य, सरदार पटेल रिंग रोड, रामोल, अहमदाबाद, गुजरात) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष जयस्वाल हे एशियन पेंटच्या दिल्लीतील कार्यालयात काम करतात. जयस्वाल यांना उरुळी देवाची परिसरात बनावट एशियन पेंट तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने जयस्वाल यांनी गुंजाळ माळ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी वरील दोन्ही आरोपी हे एशीयन पेन्ट या कपंनीच्या परवानगीशिवाय बनावट पेंट व कंपनीच्या नावाच्या बनावट डब्याचाही विक्रीकरीता वापर करीत होते.
दरम्यान, या कारवाईत 3 लाख 64 हजार 506 रुपयांचा बनावट एशियन पेंट जप्त करण्यात आला आहे. तर दोघांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायदा 1957 चे कलम 51, 63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.