इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींची भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यात इंदापूरच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.५) इंदापूरचे ज्येष्ठ नेते, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी दशरथ माने यांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यांच्या या भेटीने तालुक्यात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
माजी सभापती दशरथ माने हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. इंदापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. ते स्वतः जिल्हा परिषदेला निवडून आले हेाते. तसेच त्यांचे चिरंजीव प्रवीण मानेही जिल्हा परिषदेत सभापती होते. त्यामुळे त्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
भाषण सुरु असतानाच काळे झेंडे
इंदापुरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा सुरु होती. या सभेदरम्यानच एका तरुणाने फडणवीसांचे भाषण सुरु असताना काळे झेंडे दाखवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांना ही बाब वेळीच लक्षात आल्यानंतर संबंधित तरूणाला सभास्थानापासून बाहेर काढण्यात आले.
शरद पवारांच्या सभेला मात्र दांडी
गेल्या दहा दिवसांपूर्वी शरद पवार यांची इंदापूरमध्ये सभा झाली होती. त्या सभेला अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र, दशरथ माने हे अनुपस्थित होते. त्यामुळे चर्चादेखील सुरु होत्या. त्यात आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने तालुक्यात चर्चा रंगल्या आहेत.
सोनई दूधाच्या माध्यमातून घराघरात…
सोनाई दूध हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेला ब्रॅंड आहे. त्या माध्यमातून माने यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभेचा निकाल ठरविण्यात माने यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.