पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून पुणे ते संबळपूर आणि हडपसर ते गुवाहाटी या दोन मार्गावर ४० अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पुणे-संबळपूर-पुणे (ट्रेन क्रमांक ०८३२८) ही साप्ताहिक विशेष गाडी दि. १६ एप्रिल ते २ जुलै या दरम्यान १२ गाड्या धावणार आहेत. दर मंगळवारी पुण्याहून एक गाडी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता संबळपूरला पोहोचणार आहे. तर, संबळपूर-पुणे (ट्रेन क्रमांक ०८३२७) ही साप्ताहिक विशेष गाडी दि. १४ एप्रिल ते ३० जून या दरम्यान १२ गाड्या धावणार आहेत. दर रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता एक गाडी सुटणार असून, पुण्याला तिसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कंटाबांजी, टिटलागड, बालनगीर आणि बरगढ़ रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हडपसर-गुवाहाटी-हडपसर (ट्रेन क्रमांक ०५६०९) ही साप्ताहिक विशेष गाडी ९ मे ते २७ जून या दरम्यान एकूण ८ गाड्या सुटणार आहेत. हडपसर येथून दर गुरुवारी एक गाडी सकाळी १० वाजता सुटणार असून गुवाहाटीला तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचणार आहे. तर, गुवाहाटी-हडपसर (ट्रेन क्रमांक ०५६१०) ही साप्ताहिक विशेष गाडी ६ मे ते २४ जून या दरम्यान एकूण ८ गाड्या धावणार आहेत. दर सोमवारी गुवाहाटी येथून रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी एक गाडी सुटणार असून, पुण्यातील हडपसरला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, खगरिया, नवगछिया, कटिहार आणि न्यू जलपाईगुडी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.