पिंपरी : आपल्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागाने सलून व्यावसायिकाकडे १५ हजारांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवरील रामभाऊ पुरुळेकर शाळेसमोर घडला.
याबाबत अनिरुद्ध अशोक चौधरी (वय-३६, रा. वराळे गाव, ता. मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओनम भेगडे (वय-४०, रा. डोळनाथ मंदिराजवळ, तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव चाकण रोडवरील धर्मानंद बिल्डींगमध्ये फिर्यादी चौधरी यांचे सलूनचे दुकान आहे. चौधरी यांनी आरोपी भेगडे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच रागातून आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानात येऊन १५ हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरडा करुन फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली.
दरम्यान, आरोपीने दहशत माजवल्यामुळे दुकानातील ग्राहक घाबरून पळून गेले. त्यावेळी दुकानासमोर नागरिकांनी गर्दी केली. फिर्यादी आरडाओरडा करत होते. मात्र, आरोपीच्या दहशतीमुळे कोणीच मदतीला धावून आले नाही.