पुणे : गर्दीचा हंगाम संपला तरी रेल्वेला प्रवाशांची गर्दी कायम आहे. त्यामुळे पुणे विभागातून हंगामी काळासाठी धावणाऱ्या पुणे-हरंगुळ, पुणे-कोल्हापूर आणि सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना माेठा दिलासा मिळाला आहे.
पुणे-कोल्हापूर विशेष गाडी नं. ०१०२३ आणि ०१०२४ या दोन्ही गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. मात्र, वाढत्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे त्या दोन्ही गाडयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या आता ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. यामुळे पुणे-कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे.
पुणे-हरंगुलदरम्यान धावणारी दैनिक विशेष गाडी नं ०१४८७ आणि ०१४८८ या दोन्ही गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. मात्र, वाढत्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. यामुळे धाराशिव, लातूरला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.
सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २५ जूनपर्यंत दर मंगळवारी धावत होती. आता गाडी नं. ०१४३५ सोलापूर- एलटीटी आणि गाडी नं ०१४३६ एलटीटी ते सोलापूर साप्ताहिक विशेष या दोन्ही गाड्यांची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या २५ सप्टेंबरपर्यंत नियमित वेळेनुसार धावणार आहेत.
दरम्यान, पुणे-हरंगुळ, पुणे-कोल्हापूर आणि सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिन या तीनही गाड्यांचा दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यात कोणताही बदल होणार नाही. विशेष शुल्कावर विशेष गाड्यांचे तिकिट बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.