पिंपरी-चिंचवड : निगडी येथे तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला. निगडीतील फोनिक्स ‘स्पा’वर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या वेळी चार तरुणींची सुटका केली. छापा टाकण्यात आलेल्या ‘स्पा’ महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमध्ये इन्स्पिरिया मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या ‘स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवले. त्यावेळी तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघडकीला आले.
दरम्यान, बनावट ग्राहकामार्फत पोलिसांनी वेश्याव्यवसाय खरंच केला जातो का? याची शहानिशा केली. यानंतर ‘स्पा’वर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. स्पा सेंटरमधील महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश गुप्ता याचा पोलीस शोध घेत आहेत.