पुणे : पुण्यात महागड्या सायकली चोरीच्या घटनात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता सहकार नगर पोलिसांनी एका सायकल चोरट्याला अटक केली आहे. अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे (वय २१, रा. स्नेह घर, शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड मागे, शिवाजीनगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जानेवारी २०२४ पासून शहरातील के. के. मार्केट, स्मशानभुमी रोड, तीन हत्ती चौक तसेच बालाजी नगर या ठिकाणाहुन अंकुश गोंडगीरे याने सायकल चोरी केल्या होत्या. आरोपीकडून चोरी केलेल्या तब्बल सहा सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना खबऱ्यामार्फत आरोपी गोंडगीरे धनकवडी येथील जवाहर बेकरीजवळ सायकलवर फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अंकुश गोंडगीरे याला ताब्यात घेतले. आरोपीने जानेवारी २०२४ पासून के. के. मार्केट, स्मशानभुमी रोड, तीन हत्ती चौक, बालाजी नगर आदी ठिकाणाहुन सहा सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या सहा सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक सुरज गोरे, सहायाक फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल वाघ, भाऊसाहेब आहेर यांनी केलेली आहे.