पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावलीला कार्यकारी समितीने प्राधिकरण सभेसमोर ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. अपर मुख्य सचिव वित्त तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज सोमवारी (ता.३०) मंत्रालयात पार पडली. या बैठकीत वरील मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला, सह आयुक्त बन्सी गवळी व स्नेहल बर्गे, मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे उपस्थित होते. तर दोन्ही महानगरपालिका आयुक्त, दोन्ही पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक हे व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे उपस्थित होते.
या बैठकीत प्राधिकरणाच्या आकृतीबंध मान्यतेचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच मार्च महिन्यात होणार्या प्राधिकरण सभेत आकृतीबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला शासन मान्यता मिळाले नंतर प्राधिकरणाला स्वताचे कर्मचारी अधिकारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदाचे उप महासंचालक प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने केले. या समिती मध्ये सेवा निवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी प्रमोद रेंगे व सेवा निवृत्त उप जिल्हाधिकारी मुकेश काकडे यांनी सदस्य म्हणून व उप मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यांनी सचिव म्हणून काम केले आहे. त्यांना या कामासाठी सह आयुक्त बंसी गवळी व महानगर आयुक्त राहुल महिवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, उप अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक अशी विविध पदे थेट पद्धतीने एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. एकूण ४०७ पदांच्या आकृतीबंधामध्ये १५७ पदे सरळ सेवेने भरली जाणार असून तर उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील.
तत्कालीन पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या कर्मचार्यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या असून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसांना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत पीसीएनटीडीएलएचे ४० कर्मचारी कार्यरत असून ५० अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.