पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रातल्या पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया ही शहरे नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहेत, अशी खळबळजनक माहिती मिळत आहे. नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षल चळवळीवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील या पाच शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे. सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी हे केले जाणार आहे. याविषयी माहिती देताना “सीपीआय’ माओवाद्यांचाच एक भाग असलेल्या ‘युनायटेड फ्रंट’मार्फत शेतकरी, विद्यार्थ्यांमार्फत शासनाविरोधात रोष निर्माण करण्याचे काम केले जाते. ज्यांना आपण शहरी माओवादी म्हणतो, त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये त्यांनी त्यांचे नेटवर्क तयार केले आहे. या ठिकाणी शहरी नक्षलवाद पेरणे सुरु आहे. शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या ५४ संस्था आमच्या रडारवर आहेत,” ही माहिती नक्षलवाद विरोधी मोहिमेचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली.
समाजात सरकारविरोधी असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्या ५४ संघटना पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सीपीआय माओइस्ट या बंदी घातलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट ही शाखा राज्यातल्या पाच शहरांमध्ये आंदोलने आणि घातपात घडवणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षली चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहेत. पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवले होते. तसेच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली.